दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

SSC HSC Exam : राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक असणार नाही, असे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. विद्यार्थी फक्त एकदाच बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा (प्रीबोर्ड आणि बोर्ड) घेतली जाईल. पण सर्व विद्यार्थ्यांसाठी ते बंधनकारक नसेल असे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या ‘सेट’मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मुलांना तणावमुक्त वातावरण देणे ही आमची जबाबदारी आहे, आम्ही त्यासाठी सातत्याने काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

 

शैक्षणिक आणि व्यावहारिक कौशल्यांमध्ये समन्वय

नवीन पिढीला 21 व्या शतकातील कार्यस्थळासाठी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालये एकत्रितपणे काम करत आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावहारिक दोन्ही कौशल्ये प्रदान करण्यासाठी समन्वय निर्माण करत आहोत, असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.

 

बारावीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.

आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment